Half Price Books India
Reportingche Divas by Anil Awachat
Reportingche Divas by Anil Awachat
Couldn't load pickup availability
अनिल अवचट गेली चाळीसहून अधिक वर्षं विविध सामाजिक प्रश्नांवर लिहीत आहेत. आज लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले अवचट मुळात पिंडाने पत्रकार. त्या भूमिकेतूनच ते पंतप्रधान इंदिरा गांधींपासून चळवळीतल्या सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांसोबत वावरले. त्यांना दिसणारं जग त्यातल्या कंगो-यांसह लेखणीतून उतरवत राहिले. त्यांचं हे लेखन आजच्या पिढीला ज्ञात नाही. अवचटांचं हे लिखाण म्हणजे सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेचा वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टींगची रूढ चौकट आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय-सामाजिक अंतर्प्रवाहांना आवाज देणारा हा दस्तावेज.
१९७०च्या दशकात 'मनोहर' आणि 'साधना' या साप्ताहिकांत प्रसिद्ध झालेल्या अवचटांच्या सात लेखांचं हे पुस्तक.. त्यांच्या लेखन कारकिर्दीतील 'रिपोर्टिंग'ची बाजू अधिक उठावदार करणारं.
उदाहरणादाखल सांगायचं तर या पुस्तकातल्या तीन लेखांबद्दल असं सांगता येईल-
- १९७४ साली पंतप्रधान इंदिरा गांधी पुणे दौऱ्यावर आल्या असताना अवचटांनी त्यांच्या ताफ्यासोबत घालवलेला अख्खा दिवस 'इंदिराबाईंचा फेरा' या लेखात जसाच्या तसा उतरलाय.
- 'अँग्री पँथरची झुंज' हा लेख नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार इत्यादींना भेटून 'दलित पँथर'च्या वादळी घडामोडींची तटस्थ बाजू मांडणारा आहे. पण ही बाजू एवढी तटस्थपणे आणि स्पष्टपणे मांडली गेली की या लेखामुळे पँथर्समध्ये फुट पडल्याचाही ठपका ठेवला गेला.
- १९७७ सालच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पु. भा. भावे यांची अवचटांनी घेतलेली मुलाखत. नवकथेच्या प्रवाहातील अग्रणी असलेले भाव्यांसारखे साहित्यिक कुठल्या सनातनी काळात जगत होते हे उघड करायला अवचटांचं रिपोर्टिंग कारणीभूत ठरलं.
---याशिवाय १९७३ सालचं नाभिक समाजाचं संमेलन, १९७५ साली आणीबाणीपूर्वी जयप्रकाशांनी सुरू केलेले जन आंदोलन, १९७२च्या ऑक्टोबरमधे पुण्यात भरलेली राज्य मंत्रिमंडळाची बैठक (याच वर्षी प्रसिद्ध झालेल्या 'साधने'च्या 'काळा स्वातंत्र्यदिन' विशेषांकाच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त ठरलेली) यांचं रिपोर्टिंग अवचटांच्या खास शैलीत या पुस्तकात आहे. हा अख्खा काळच सामाजिक - राजकीयदृष्ट्या धामधुमीचा. अवचटांनी तो जसाच्यातसा पकडला आणि सत्तरीच्या दशकातल्या या सात लेखांमधून त्या काळाचाच एक 'रिपोर्ताज्' तयार झाला, तेच हे पुस्तक 'रिपोर्टिंगचे दिवस'.
