Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Watchal By Pratap Pawar

Watchal By Pratap Pawar

Regular price Rs. 59.00
Regular price Rs. 120.00 Sale price Rs. 59.00
Sale Sold out
Condition
इ-सकाळ सप्टेंबर २५, २००५
सर्जनशील उद्योगसंस्कृतीचा मूलमंत्र 
(प्रा. रा. ग. जाधव)

अदम्य इच्छाशक्ती, अखंड परिश्रम, बर्‍या-वाईट औद्योगिक वास्तवाचे नेमके आकलन, वैज्ञानिक-तांत्रिक अद्ययावत ज्ञान आणि सुसंस्कारांची शिदोरी यांच्या बळावर प्रतापराव पवार यांनी यांत्रिक-तांत्रिक उपकरणांच्या उत्पादन क्षेत्रात तथा वितरण-व्यापारात स्पृहणीय यश प्राप्त करून घेतले. 'सकाळ'सारख्या अग्रेसर वृत्तपत्राचेही १९८५ पासून यशस्वी व्यवस्थापन व संवर्धन करून अव्वल स्थानावरील त्याची विश्वसनीयता दृढ केली. शेतकरी कुटुंबातील एक अस्सल भूमिपुत्र तंत्रज्ञ होतो, उद्योजक बनतो व एका अग्रेसर वृत्तपत्रसमूहाचा संचालक होतो, या वस्तुस्थितीला प्रतापरावांच्या वैयक्तिक दृष्टीने आहे त्यापेक्षा अधिक लक्षणीयता सामाजिक दृष्टीने आहे. 'वाटचाल' या आत्मकथनात्मक लेखसंग्रहात प्रतापरावांनी आपल्या साठ वर्षांच्या उद्योगपर्वाचे मूल्यलक्ष्यी पुनरावलोकन प्रांजळपणे केले आहे. मी कसा झालो, हे त्यांना अभिप्रेत नसावे, तर मला जसा व्हायचे होते व तसाच मी झालोही, हे त्यांना स्वत:ला व इतरांनाही जणू सांगावयाचे आहे. आत्मविशदीकरण करणारे हे वेधक आत्मकथन आहे. निष्णात व्यावसायिकाची मुद्देसूद, सारसंक्षेपी व थेट स्वरूपाची विवेकप्रक्रया व तिची तशीच आटोपशीर अभिव्यक्ती या 'वाटचाली'तून जाणवते व माझ्यासारख्या वाचकाला खिळवूनही ठेवते.

या आत्मकथनात संस्कार, सामाजिक, व्यावसायिक, व्यक्तिचित्रे, परदेशप्रवास व परिवर्तन अशा उपशीर्षकांचे सहा उपविभाग असून, प्रत्येक उपविभागात अनेक घटना व व्यक्ती यासंबंधीचे अर्थपूर्ण स्वानुभव मोजक्या व रेखीव वर्णनातून व्यक्त केले आहेत. या स्वानुभवांना एकाच वेळी स्वतंत्र अर्थपूर्णताही आहे आणि त्या त्या उपविभागीय मुख्य विचारसूत्राशी त्यांचे साभिप्राय असे सूचक नातेही आहे. एखाद्या कलात्मक चित्रपटात प्रत्येक दृश्यचौकट जशी सुंदर-स्वयंपूर्ण असूनही व्यापक चित्रपटकथेला ती अर्थपूर्ण करणारी गती देत राहते, त्यासारखी या आत्मकथनाची शैली आहे. अनुभव घेणारे प्रतापराव व अनुभव देणारे व्यक्ती-प्रसंगांचे पर्यावरण यांच्यातील नाटयपूर्ण पण विवेकसंपन्न असा हा 'व्यापार' मोठा उदबोधक वाटत राहतो. आदल्या दिवशीच्या क्रिकेट सामन्यातील बहारदार व अटीतटीच्या खेळींची नेत्रसुखद झलक दुसर्‍या दिवशी 'टीव्ही'वर बघताना जे जाणवते, तसाच प्रकार 'वाटचाल' वाचताना घडतो. 

स्पर्धेच्या शर्यतीत अहोरात्र आकंठ बुडालेला आधुनिक उद्योजक हसणारा व हसविणाराही असतो, याचाही सुबक प्रत्यय या वाटचालीत अधूनमधून आढळणार्‍या विनोदाच्या चिमुकल्या रांगोळ्या देत राहतात. प्रतापरावांच्या मतानुसार, सगळ्याच पवार कुटुंबीयांत उपजत विनोदबुद्धी वास करत असते. सौ. भारती यांना प्रतापरावांसारखाच बुद्धिमान पण देव आनंदसारखा पती हवा होता हे खरे; पण प्रतापरावांनाही भारतीसारखीच बुद्धिमान पण वहिदा रेहमानसारखी पत्नी हवी होती. या दोघांची नियतीने केलेली फसवणूक वाचकांची दिलखुलास हसवणूक करून जाते.

प्रतापराव पवार हे जवाहरलाल नेहरूप्रणीत वैज्ञानिक-तंत्रविद्याधिष्ठित अशा आधुनिक भारतीय उद्योगपर्वाच्या पहिल्या कालखंडाचे (म्हणजे १९९१ पर्यंतच्या) सहप्रवासी व प्रतिनिधी आहेत. महाभारताच्या उद्योगपर्वात युद्धसज्जतेच्या उद्योगाचे वर्णन आहे. प्रतापरावांनाही या आधुनिक उद्योगपर्वात योद्धाच होणे भाग पडले. लायसेन्स-परमिट राजचा हा कालखंड होय. या जीवघेण्या उद्योगपर्वाला प्रतापरावांनी जिंकून दाखविले. या यशोगाथेची मुळाक्षरे प्रतापरावांच्या संस्कारसंचिताच्या शाईने लिहिलेली आहेत. या आत्मकथनाचा पहिला उपविभाग 'संस्कार' याच मथळ्याचा आहे आणि हा ग्रंथ लेखकाने संस्कारदात्या ई-वडिलांनाच अर्पण केला आहे. संस्कार सर्वत्र व सदासर्वदा चोहोंकडून झिरपतच असतात; पण पवारांसारखी एखादीच महत्त्वाकांक्षी व्यक्ती ते हेरून, वेचून, त्यांचा अर्थ लावून त्यांचे विधायक व्यवहारचातुर्यात रूपांतर करू शकते. उद्योगपर्व, उद्योजक, औद्योगिक संस्कृती यांची जडणघडण केवळ वैज्ञानिक-तांत्रिक ज्ञानाने होत नाही, तर ती एका चौकस, युयुत्सू, इहवादी अशा जीवनविषयक व्यापक तत्त्वज्ञानाच्या आधारे होत असते. आधुनिक भारताला असे तत्त्वज्ञान पूर्वी अवगत नव्हते, पण प्रतापरावांसारख्या हाडाच्या उद्योजकाला ते अंत:प्रेरणेने वा एएतिहासिक प्रेरणेने समजले. या आत्मकथनात आधुनिक भारताच्या औद्योगिक पुनर्रचनेच्या तत्त्वज्ञानाचे प्रेरक अंश विखुरलेले आहेत व ते जाणकारांच्या सुविहित स्वरूपात मांडूनही दाखविता येतील.

स्वतंत्र भारताचे औद्योगिक प्रगतीचे दुसरे महत्त्वाचे पर्व १९९१ पासूनच्या आर्थिक उदारीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या मुक्त वातावरणात प्रवष्ट झालेले आहे. या संदर्भात प्रतापरावांचे हे आत्मकथन प्रस्तुत व प्रेरक ठरणारे आहे. कारण त्यातून भारताच्या वेगवान उद्योगपर्वाच्या सामाजिक-सांस्कृतिक उत्तरदायित्वाची स्पष्ट समज पदोपदी व्यक्त झालेली आहे आणि क्रियाशीलही झालेली आहे. प्रतापरावांच्या सगळ्याच भावंडांत, मातापित्यांत समाजसेवेची, सामाजिक न्यायाची, व्यक्तिमूल्याची व सांस्कृतिक इतिकर्तव्याची स्वच्छ जाणीव जागृत राखल्याचे आढळते. आज उद्याच्या भारतीय औद्योगिक प्रगतीत अशा जाणिवा जपल्या नाहीत, तर आपल्या औद्योगिक संस्कृतीचे उद्दिष्टच पराभूत होईल. समतेच्या, न्यायाच्या लोकशाही मूल्यांची अंमलबजावणी सकलांच्या कल्याणाचे व्रत घेतलेली औद्योगिक-उद्योजक संस्कृतीच करू शकेल.

प्रतापरावांच्या या आत्मकथनात त्यांच्या मित्रपरिवारातील अनेक लहान-थोरांची मार्मिक स्वभावरेखाटने आहेत. त्यांचे वडीलबंधू शरद पवार, शंतनुराव किर्लोस्कर, डॉ. बानूबाई कोयाजी, चंद्रशेखर आदींच्या चित्रणांतून त्यांच्यासंबंधीचे प्रवाद व गैरसमज दूर होतात. आपल्या समाजाच्या हाडीमांसी खिळलेल्या जातीय ग्रह-पूर्वग्रहांचेही अंतर्मुख करणारे दर्शन काही प्रसंगांतून घडते. 'सकाळ पेपर्स'च्या मालकीबाबतच्या अनुभवचित्रातूनही आपल्या परंपरागत कालबाह्य अपसमजांची अस्वस्थ करणारी कल्पना येते. हे विविधांगी समाजभाष्य आज-उद्याच्या उद्योजकांना व समाजसेवकांना सावध, डोळस व समंजस करणारे ठरावे. मोजक्याच परदेशांच्या प्रवासवर्णनातूनही हा माणूस आपला भारत, भारतवासी आणि त्यांच्या मनोरचनेतील त्रुटी, उणिवा यांचाच तौलनिक संदर्भात वेध घेत राहतो. तोही आज-उद्याच्या युयुत्सू उद्योगपर्वातील वाटसरूंना उदबोधक वाटेल.

उद्योगपर्वाची ही 'प्रतापी' अनुभवगाथा आपल्या सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक परिवर्तनात प्रभावी उत्प्रेरक (कॅटॅलिस्ट) ठरेल. कारण आपल्यातील जातीय, प्रांतिक, धार्मिक व आंतरदेशीय स्वरूपाच्या भ्रामक पूर्वग्रहांना, गृहीतकांना आणि गैरसमजांना तिने खोटे पाडले आहे.

प्रतापरावांच्या मूल्यलक्ष्यी आत्मकथनाचे हे पुस्तक सुबक व शुद्ध छपाई, वाचनसुलभ मोठा टाईप व मऊ, मंद चमक असलेला कागद यांनी आकर्षक केलेले आहे. 'परिवर्तन' या समारोपाच्या शेवटच्या उपविभागात त्यांच्या उद्यमशील यशस्वी जीवनाची बलस्थाने थोडक्यात दिग्दर्शित केली आहेत. वयाच्या साठीच्या टप्प्यावर त्यांना जाणवलेला सर्जनशील उद्योगसंस्कृतीचा व उद्योजकाचा जो निष्कर्ष आहे, त्याचा मूलमंत्र आहे, ''आपण जगायला हवं. चांगलं जगायला हवं. भरभरून जगायला हवं.'' आणि त्यातून जे सूचित केले आहे, ते आहे- 'सकलांनी जगायला हवं. चांगलं जगायला हवं. भरभरून जगायला हवं.' यापेक्षा अधिक असे आपणाला तरी काय हवे आहे?
View full details