Half Price Books India
Robinson Aani Mandali By B R Bhagwat
Robinson Aani Mandali By B R Bhagwat
Couldn't load pickup availability
१८ व्या शतकाच्या सुरवातीस डॅनियल डेफोच्या ‘‘रॉबिन्सन् क्रूसोने” इंग्रजी कादंबरी-वाङ्मयात एक नवीनच परंपरा सुरू केली. ती म्हणजे रोमांचकारी सागरी हकीकतींची. २०० वर्षांपूर्वी सुरू झालेली ही परंपरा जोसेफ कोनरॅडसारख्या प्रतिभावंत कादंबरीकारांनी आपल्या शतकातही टिकवून धरली आहे. Wyss ची “swiss family Robinson” ही मूळातील जर्मन कादंबरी ह्याच परंपरेतील. तसे पाहिले तर Wyss हा पेशाने तत्त्वज्ञानाचा शिक्षक. साहित्याशी त्याचा संबंधही खरे म्हणजे काडीमात्रच असावयास हवा. पण मौज अशी की आज तो आपल्यासमोर आहे तो एक दर्यावर्दी जीवनावर कादंबरी लिहिणारा लेखक म्हणून. याचे श्रेय द्यायचे झाल्यास त्याच्या वडिलांनाही द्यावे लागेल, कारण त्यांनीच ही कादंबरी लिहायला घेतली होती. परंतु त्यांच्या हातून ती अपुरीच राहिली. वडिलांचे अपुरे राहिलेले काम जॉनने सहज म्हणून हातात घेतले आणि तो एक अमर लेखक झाला. याला कोणी योगायोग म्हणोत की अपघात म्हणोत. पण हे जर घडले नसते तर आपण एका नामांकित कलाकृतीला मुकलो असतो. ‘Swiss family Robinson’ मध्ये जे काही घडते ते ह्या परंपरेतील बहुतेक करून सर्वच कादंबऱ्यांत घडते. म्हणजे असे की सुरवातीस एखादे गलबत सफरीस निघायचे आणि दुर्दैवाने ते वाटेतच वादळात सापडून फुटायचे, मग त्यावरील काही प्रवासी किंवा एखादाच प्रवासी हे कुठल्या तरी अज्ञात बेटावर येऊन पडायचे. मग सुरू व्हायचे त्यांना त्या निर्जन बेटावर येणारे चित्रविचित्र, अद्भुतरम्य, काळजाचा थरकाप उडवून टाकणारे अनुभव. हे अनुभव संपले की मग एखादे जहाज केवळ दैवयोग म्हणून त्यांच्या दृष्टीला पडणार आणि शेवटी त्यांना मायदेशी परत घेऊन येणार. परंतु असे असले तरी, अशा कादंबऱ्या कधीच नकोश्या झाल्या असे होत नाही; किंबहुना त्या परत वाचाव्याशा वाटतात. कुमारांना तर त्या संपूच नये असे वाटते. ह्याचे कारण म्हणजे मानवी स्वभावातच अद्भुतरम्य अनुभवांचे आकर्षण निसर्गातःच आहे. ‘रॉबिन्सन आणि मंडळी’ सारखी कादंबरी नेमकी ह्याच मर्मावर बोट ठेवते. पहिल्या ओळीपासून आपल्या मनाची उचलबांगडी समुद्राच्या थयथयाटात वाट काढणाऱ्या गलबतावर होते. भोवतालच्या भीषण काळोखाच्या पार्श्वभूमीवर आपण फ्रीझ, फ्रान्स, अर्नेस्ट इ. मंडळींशी एकरूप होतो. त्यांचे अनुभव आपले मानायला सुरवात करतो. मंडळी अज्ञात बेटावर खोपटं उभारायला लागली की आपल्या हातात फळ्या घेऊन त्यांना आपण मदत करतो आहोत असे वाटू लागते. त्यांना भेटणारे नवे नवे प्राणी आपल्याही परिचयाचे होऊ लागतात. त्यांनी स्फटिकांच्या गुहेत उड्या टाकल्या की आपलीही छाती धडधडू लागते. देवमाशाचा अवाढव्य आकार पाहून छोटा फ्रान्झ नि त्याची आई तर चकित होतातच, पण आपणही ते साठ ते पासष्ट फूट लांबीचे आणि तीस ते चाळीस फुट घेराचे धूड मन:चक्षूंसमोर उभे राहताच हरवून जातो. थोडक्यात म्हणजे Wyss ची प्रभावी वर्णनशक्ती आणि आपली कल्पनाशक्ती यांची गाठ पडते नि आपण रॉबिन्सन कुटुंबीयांपैकी एक आहोत असे होऊन जाते. परंतु याशिवाय आणखीही काही घडते. जेव्हा मूळ कादंबरी प्रकाशित झाली तेव्हा तिच्यात असलेल्या म्हणी आणि सुभाषितांवर खूपच टीका झाली. लोकांना वाटले की बोधप्रद भागाची ह्यात काहीच गरज नव्हती.पण जरा खोलवर विचार केला की आपणाला समजून येते की, रॉबिन्सन मंडळींना नुसतेच अनुभव येत नाहीत तर त्या अनुभवापासून ते काही तरी शिकवण घेतात आणि आपण जर त्याच उत्कटतेने ते अनुभव घेतले तर आपणास देखील ते विचार यथार्थ वाटतील व समजून घेता येतील. अर्थात हे सारे अवलंबून राहते ते कादंबरीशी आपण किती एकरूप होतो ह्याच्यावर. मराठी वाङ्मयात अशा प्रकारच्या कादंबऱ्या फारच थोड्या आहेत आणि आहेत त्या देखील भाषांतरित. त्यामुळे रॉबिन्सन मंडळी थोडी नवखी वाटेल, पण ती आवडेल खासच. कारण धाडसी आणि साहसी जीवन जगण्याची आवड मराठी माणसांना नक्कीच आहे.
