Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Pan Bolnar Ahe By Mangala Godbole

Pan Bolnar Ahe By Mangala Godbole

Regular price Rs. 79.00
Regular price Rs. 160.00 Sale price Rs. 79.00
Sale Sold out
Condition
साप्ताहिक सकाळ २१ जून २०१०
बोलता यावं म्हणून!
-- योगिनी वाघमारे
"पण बोलणार आहे' हा मंगला गोडबोले यांचा सद्य:स्थितीचा धांडोळा घेणारा, आधुनिक जीवनव्यवहारातील सूक्ष्म बदल टिपणारा लेखसंग्रह "राजहंस प्रकाशन'ने प्रसिद्ध केला आहे. एका वृत्तपत्रातील सदरात नियमितपणे भेटणारी लेखिका पुस्तकाच्या सुरवातीला आणि शेवटी आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडते.
मनात साचलेले प्रश्न आणि त्यावरचं उत्तर, अशी कोंडी अनेकांची होते. बोलायचं खूप असतं; पण ऐन वेळी बोललंच जात नाही. दैनंदिन जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींविषयी बोलतानाही लोक का थबकतात, याचं लेखिकेला कुतूहल वाटतं. त्याचा शोध घ्यावासा वाटतो. तो घेत असताना भोवतालाबद्दल, समकालीन वास्तवाबद्दल, त्यातील बदल आणि परिणामांबद्दल अनेक प्रश्न लेखिकेला पडतात. त्यावर खूप बोलावंसं वाटतं. या बोलण्यातूनच वैचारिक, भावनिक, नैतिक, सामाजिक अशा अनेक भावकल्लोळांवर ती संवाद साधते. संवाद साधताना मार्गदर्शन न करता व्यवहारदर्शन घडवते.
संग्रहातील बरेचसे लेख इतरांशी झालेल्या संवादातून, तर काही स्वानुभवातून लिहिले गेले आहेत. संग्रहाच्या सुरवातीलाच ज्येष्ठांच्या एकाकीपणावर लेख आहे. वेळप्रसंगी ज्येष्ठांकडे कुणी बघावं, या प्रश्नावरील संवाद प्रभावी; पण अनुत्तरित राहतो. मग "कोणाकडून' हा प्रश्न लेखिका वाचकांसमोर ठेवते आणि "तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का,' असा सवालही करते.
किराणा दुकानांैवजी मॉल, सुपर मार्केट आल्यामुळं ग्राहक आणि दुकानदार या नात्यातील संपलेला जिव्हाळा "सोय'मध्ये दर्शविला आहे.
"एकदा तरी', "हे की ते' या लेखांमध्ये मुलांना नको तितकं दिलेलं स्वातंत्र्य आणि साधनं यावरचा संवाद आहे, तर परदेशात स्थायिक झालेल्या; पण भारतभेटीला आलेल्या आप्तांच्या पूर्वग्रहावर आधारित विचारांना "ते येतात' मध्ये वाट करून दिली आहे. "मग मी काय करू' या लेखातून एकुलत्या, एकाकी मुलांची समस्या व्यक्त होते, तर "एकमेव अद्वितीय'मधून स्पर्धात्मक युगातील पालकांचा प्रश्न, त्यांची घुसमट व्यक्त होते.
"थांब माझ्या संसाराला'मध्ये कर्तृत्ववान स्त्रियांची अवस्था चिऊताईच्या संसाराशी जोडून लेखिकेने अशा स्त्रीची मानसिकता उलगडली आहे. "श्रीमंत पतीची राणी' लेखात ऐश्वर्यवान स्त्रियांची घुसमट, सामाजिक दृष्टिकोन यावर भाष्य आढळतं. "लंबक' लेखातून वधुवरांची हल्लीची विचारसरणी, काळानुरूप झालेला बदल टिपला आहे. दोन मैत्रिणींच्या संवादातून झकपक, पॉश दुकानातील खरेदी आली आहे. विरोधाभासाचं दृश्य या लेखातून समोर उभं राहतं. काउन्सिलिंगचं "फॅड', सुटीतले विविध क्लास म्हणजे मुलं "उगाच टाइमपास' करतात म्हणून लावलेली सोय असते, तर मुलांसाठी दुर्मिळ झालेली आजी-आजोबांची गोष्ट "अवघड गोष्टी'मधून येते.
"लव्ह मॅरेज असूनसुद्धा', "बिचारी एकटी आहे', "वास्तव नेति! नेति!' हे लेखही विचार करायला लावणारे आहेत. लेख वाचल्यानंतर स्वत:ची प्रतिक्रिया उघडपणे देणार्‍या वाचकांपैकी कोणी स्वत:ची समस्या मांडायला लावणारेही भेटतात ते "जनरेशन आर' मध्ये!
मंगला गोडबोले यांनी या आणि अशा अनेक लेखांद्वारे विषयवैविध्य वाचकांसमोर मांडलं आहे. संवादात्मक बोलणं रेखाटताना छोट्या-मोठ्या विषयांना सोप्या, विनोदी शैलीत, कधी प्रश्नार्थक तर कधी चिंतनात्मक स्वरूपात बोलतं केलं आहे. १६८ स्फुट लेखांचा हा संग्रह १७१ पानी आहे. मुखपृष्ठ देखणं असून, पुस्तक वाचून कधी पूर्ण होतं, ते कळत नाही. काही बोलण्यासाठी तरी ते नक्कीच वाचायला हवं.
View full details