Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Naticharami By Meghana Pethe

Naticharami By Meghana Pethe

Regular price Rs. 315.00
Regular price Rs. 350.00 Sale price Rs. 315.00
Sale Sold out
Condition
ई-सकाळ रविवार १८ डीसेंबर २००५
पांढरे स्वच्छ फेसाळ पाणी

मेघना पेठे यांनी 'नातिचरामि'च्या निमित्ताने कादंबरी या वाङमय प्रकारात दमदारपणे पाऊल ठेवले आहे. कथेपेक्षा कादंबरी साहित्यप्रकार हा फार मोठा आवाका असणारा प्रकार आहे. म्हणूनच या कादंबरीबद्दल उत्सुकता वाटणे स्वाभाविक नि साहजिक होते. 'नातिचरामि' कादंबरी तिच्या आशयापेक्षा तिच्या शैलीच्या सामर्थ्याने सर्वप्रथम लक्ष वेधून घेते.
रूढ अर्थाने ज्याला आपण कादंबरीचा 'फाआरEम' म्हणतो, त्या ठराविक 'फाआरEम'मध्ये या कादंबरीची मांडणी नाही. विशिष्ट कथानक, त्याचा आरंभ, मध्य, शेवटातीत व्यक्तिरेखांसह विकास अशा टप्प्यांतून ही कादंबरी सरकत नाही. या साच्यात ती सामावलेलीही नाही. तर अनेक विचारांचे अखंड मंथनच ही कादंबरी शब्दबद्ध करत जाते. समाजव्यवस्थेतील स्त्री-पुरुष नातेबंधांच्या आखलेल्या चौकटींना झुगारून देत पुरुषी सामर्थ्यरचनेला शह देण्याचा वैचारिक संघर्ष ती रेखाटत जाते. यातली नायिका मीरा घटस्फोटानंतर आपलं आयुष्य जगते आहे, ती स्वत:ला स्वत:च्या इच्छा आकांक्षा-अपेक्षांना प्रमाण मानत. मग आड येणारे सामाजिक, सांस्कृतिक संकेत, नीतिनियम, मूल्यआचारांच्या संकल्पना ती ठोकरते. स्वत:शी संवाद-विसंवाद करताना समोरच्या जगाशीही संघर्ष मांडते. तिच्या विस्कटलेल्या आयुष्याच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवरून ती लग्नसंस्थेचे नि पुरुषी सामर्थ्याचेही वाभाडे काढते. स्वत:च्या लैंगिक इच्छांचा हवा तसा सन्मान करते आणि एकूणच समाजव्यवस्थेच्या अनेक स्तरांवरील बंधनांच्या तारांची ही कुंपणं उखडून टाकते. नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना-संकल्पनाचीही लक्तरं काढते. मीराचा हा स्वतंत्र, धाडसी दृष्टिकोन कमालीचा मुक्त आहे. तो तिच्यासारख्या अनेक घटस्फोटित स्त्रियांच्या दृष्टिकोनांशी मिळताजुळता वा त्याचं प्रतिनिधित्व करणारा नसेलही. तो चढा अधिक असेल, तीव्रही असेल, टोकाचाही असेल; पण हा दृष्टिकोन एका स्त्रीचं पुरुषी सामर्थ्याला, वर्चस्वाला दिलेलं आव्हान ठरणारं आहे, हे या कादंबरीचं वैशिष्टय आहे. वेगळेपणही आहे.

मीराच्या आत्मनिवेदनातून कादंबरीचा प्रारंभ होतो. गावाहून परतलेली, घटस्फोट झालेली मीरा आता रिकाम्या घरी एकटीच प्रवेश करते आणि स्वत:च्या या एकटेपणाची पोखरणारी जाणीव तिला बोलतं करते. मग भूतकाळ ती वर्तमान म्हणून जगत राहते नि वर्तमान त्याला साक्षी होतो. भूतकाळातले तिचे नि तिच्या नवर्‍याच्या आठवणींचे तुकडे जोडता जोडता ती आपल्या विस्कटून गेलेल्या भावविश्वात डोकावते. पण या उदध्वस्त झालेल्या आयुष्याशी स्वत:ला गोठवून वा त्यात रुतून ती बसत नाही. किंबहुना आपलं लग्न मोडल्याने आयुष्य उदध्वस्त झालंय, हेच ती अमान्य करते आहे. ती पुरुषी वर्चस्वांना बेडरपणे उलथवून टाकते आहे. हे तिचं उलथवणं अगदी लग्नसंस्थेपासून सुरू होतं. लग्नसंस्थेचं फोलपण आतून तिला जाणवणं ही तिच्यातील सामर्थ्याची पहिली खूणच आहे. म्हणूनच ती तिच्या विवाहित 'पुरुष'मित्राला 'लग्न नाही केलं आपण तरी एकत्र राहू शकतो' हे ती सुचवू शकते ते याच फोलपणाच्या जाणिवेतून. मात्र तिला लग्नाशिवाय हवा असणारा सेक्सही अनैतिक वाटत नाही. थोडक्यात, ही मीरा स्वतंत्र विचारांनी जगणारी आणि आपल्याला हव्या त्याच पद्धतीने आयुष्य समजून घेणारी, तितक्याच उत्कटपणे जगण्याचे मार्ग आपलेसे करणारी आहे आणि त्याच उत्कटरीत्या तिच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनीही जगावं अशी तिची अपेक्षा आहे.

ढोबळ मनाने कादंबरीचे आशयसूत्र आपण ज्याला म्हणतो ते हे आहे, असे म्हणता येईल. मीराच्या आत्मनिवेदनातून ही कादंबरी सरकते आहे. त्यामुळे अर्थातच मीराचे व्यक्तिमत्त्व हा या कादंबरीचा खरा गाभा आहे. मीराचे व्यक्तिमत्त्व ही व्यक्तिरेखा अतिशय प्रभावीपणे, अनेक कंगोर्‍यांसह आणि मुख्यत: तिच्या तीव्र बुद्धिमत्तेच्या क्षमतांसह कादंबरीत उजळून उभी राहते, हे या कादंबरीचे मोठे शक्तिस्थान आहे नि यशही. परंतु इथेच नोंदवायला हवे, की सामाजिक, सांस्कृतिक अशा संदर्भातील नियमांची समाजमान्य बंधनं झुगारणारी ही मीरा त्या नियमांच्या अर्थांचाही एकीकडे शोध घेतेच आहे. थोडक्यात, मीराचं हे माध्यम लेखिकेने आपल्या विचारांसाठी वापरले आहे. पण कधी कधी हे माध्यमही न उरता लेखिका 'मेघना पेठे'च व्यक्त होते आहे असे वाटते. त्यामुळेच मीराचं बोलणं सहज, स्वाभाविक न वाटता प्रचारकी, पुस्तकी नि अलंकारिक वाटते. कधी इतर पात्रांचे संभाषणही.

मीराची व्यक्तिरेखा फार प्रगल्भपणे आणि झळझळीत सामर्थ्याने उभी राहते कादंबरीभर ती या शैलीतून. या दृष्टीने म्हणूनच या कादंबरीच्या शैलीला मोठे स्थान आहेच. हे मान्यही करावे लागते आणि कधीकधी हीच शैली आशयावर कुरघोडीही करत राहिल्याने ती मर्यादाही ठरते. कादंबरीची शैली हाच तिचा आशय का, असा उलटा प्रश्न पडेल इतकी शैली प्रभाव टाकते, तेव्हा या कादंबरीचा आशय एकाच बिंदूभोवती वलयं काढत राहत राहावं तसा अडखळून राहिला आहे, याची जाणीव होते. त्यामुळे कादंबरीचे प्रवाहीपण अडल्यासारखे होते.

मीरा ही नायिका वगळता इतर स्त्री व्यक्तिरेखांना कादंबरीत फार महत्त्व नाहीच. पण तरी त्यांनाही चेहरे गवसले आहेत. ओळख मिळाली आहे. मात्र तसे पुरुष पात्रांचे होत नाही. एक तर प्रथमपुरुषी निवेदनाच्या तंत्रामुळे स्वाभाविकपणे ज्या मर्यादा येतात, त्या इथेही मीराच्या आत्मनिवेदनतंत्राला येतात. मीराची एकांगी नजर तिच्या सहवासातल्या पुरुषांची केवळ 'पुरुषी मनोवृत्ती'च परखताना दिसते. या पुरुषांचे सर्वांगीण व्यक्तित्व उभेच राहत नाही. त्यामुळे साहजिकच मीरा कादंबरीच्या प्रवासात जितकी खोल, प्रगल्भपणे उभी राहत जाते, तितकीच ही पुरुषपात्रे. त्यांचे चेहरे धूसर, संदिग्धच राहतात.

कादंबरीचा शेवटही असमाधानकारक उरकल्यासारखा झाला आहे. साठ वर्षांनी मीरा भरतबरोबर आठवणींचे अन्वय लावत बसली आहे. हे मीराच्या आयुष्यभराच्या आक्रमक, स्वतंत्र वृत्तीशी विसंगत वाटते. अशा शेवटामुळे कादंबरीची आतापर्यंतची तीव्रता कोसळल्यासारखी होते.

अशा मर्यादा असूनही 'नातिचरामि' तुम्हांला गुंतवून ठेवते, ती तुमचा ताबा घेते, पकड घेते, हेही मान्य करावे लागते. एखाद्या धबधब्याचे पांढरे स्वच्छ फेसाळ पाणी अविरतपणे तुमच्यावर कोसळत राहावे तसे यातले विचार, दृष्टिकोन तुमच्यावर कोसळत राहतात आणि मेघना पेठयांच्या प्रतिभाशक्तीचा हा प्रत्यय आहे, हे तुम्हाला कबूल करावे लागते.
(मोनिका गजेंद्रगडकर)
View full details