Skip to product information
1 of 1

Inspire Bookspace

Kalawant Ani Vicharvant By Dnyanad Naik

Kalawant Ani Vicharvant By Dnyanad Naik

Regular price Rs. 69.00
Regular price Rs. 140.00 Sale price Rs. 69.00
Sale Sold out
Condition
Publication
Language
१डिसेंबर२००० 
सरोवराची प्रचीती देणारी ओंजळ 
- सुभाषचंद्र भेलके 

आपल्या जीवनाकडे आपण तटस्थ आणि विधायक दृष्टीने पाहू लागलो तर आपल्या लक्षात येते 
की, जीवनातून आपल्याला खूप काही मिळत असते; पण त्यातले आपण किती घेऊ शकतो? 
किती आपल्याजवळ ठेवू शकतो? किती गोष्टी आपल्या आहेत, असे म्हणून शकतो? या व्यापक 
विश्वजीवनातील अनुभवाचा फारच थोडा भाग आपल्या वाटयाला आलेला असतो, एक 
ओंजळभरच आपल्या वाटयाची असते! ही गोष्ट डॉ. सुरेन्द्र बारलिंगे ‘ओंजळभर पाणी’ या 
आत्मचरित्राच्या निमित्ताने आपल्याला सांगतात. 

साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून १९८० पासून मराठी माणसाला ज्ञात असलेले डॉ. 
सुरेंद्र बारलिंगे यांचे जीवन साहित्यिकाचे नव्हते. वस्तुत: तत्पूर्वीच ते देशात आणि परदेशात एक 
तत्त्वज्ञ म्हणून ख्यातिप्राप्त होते. जुन्या पिढीला तर ते मराठवाडयातील शैक्षणिक चळवळीचे 
अध्वर्यू म्हणून परिचित होते. तत्पूर्वीच्या जीवनात डॉ. बारलिंगे हे स्वातंत्रलढयातील एक 
क्रियाशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद 
स्वीकारण्यापूर्वी तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व बहरास आणले होते. 
अशा विविध पैलूंमधून प्रकट होणार्‍या या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीबद्दल त्यांच्या संपर्कात 
येणार्‍या प्रत्येकालाच नेहमी कुतूहल आणि कौतुक वाटत असे. या मागचे रहस्य उलगडणे 
त्यांच्या आत्मचरित्रामुळे सोपे झाले आहे. 

एका दृष्टीने ‘ओंजळभर पाणी’ला आत्मचरित्राएएवजी आत्मकथन म्हणणे अधिक सयुक्तिक 
होईल. या पुस्तकात डॉ. बारलिंगे यांच्या संपूर्ण जीवनाचे चित्रण आलेले नसून पुस्तकाच्या आठ 
भागांत त्यांच्या जीवनातील चार महत्त्वाच्या कालखंडांचे वर्णन आहे. आरंभीचा भाग ते आपले 
बालपण चितारण्यात घालवितात. लहानपणापासूनचे आपले कौटुंबिक, शालेय, सामाजिक आणि 
राजकीय जीवन यात डोकावतात. या भागामध्ये बारलिंगे घराण्याचा इतिहास आणि 
वैशिष्टयांबद्दलही बरीच माहिती मिळते. सुमारे शतकापूर्वीचे विदर्भी जीवन कसे होते याचे वेधक 
कवडसे पदोपदी पहायला मिळतात. हे करीत असताना डॉ. बारलिंगे आपल्याशी संबंधित 
व्यक्तींचे चित्रणही मोठया मार्मिकपणे करीत जातात. त्यांना व्यक्तिचित्रणाची एक आगळीच 
हातोटी प्राप्त झाली असून यापूर्वीच्या त्यांच्या दोन पुस्तकांतून ‘पुन्हा भेटू या’ आणि ‘आकाशाच्या 
सावल्या’ त्याचे प्रत्यंतर मराठी वाचकाला आले आहेच. लहानपण सांगत असताना आपल्या 
जीवनातील सर्व प्रेरणा आणि मूल्ये यांचे स्रोत याच काळात कसे निर्माण होत गेले याचे सुंदर; 
पण विश्लेषक विवेचन या भागात वाचायला मिळते. हे चित्रण करीत करीत लेखक तारुण्यात 
आणि त्या काळातील राजकीय चळवळीत कसा प्रवेश करतो हे कळतही नाही. 

भारतीय स्वातंत्र्यलढयाच्या इतिहासाची कित्येक पाने अजून कोरीच आहेत. डॉ. बारलिंगे यांच्या 
आत्मचरित्रात या इतिहासाची कधीही लिहिली न गेलेली बरीच महत्त्वाची पाने आपल्याला 
वाचायला मिळतात आणि विदर्भ व खानदेश या भागातील बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढयातील 
स्वातंत्र्यसैनिकांचे कर्तृत्व तपशिलांनिशी कळू लागते. अनेक लहान मोठया ज्ञान अज्ञात 
कार्यकर्त्यांचा स्वातंत्र्यलढयातील सहभाग येथे पहायला मिळतो. भूमिगत राहून कशा प्रकारच्या 
प्रसंगांना तोंड देत स्वातंत्र्यसैनिक आपला लढा चालू ठेवीत होते हे डॉ. बारलिंगे यांच्या स्वत:च्या 
जीवनावरून स्पष्टपणे कळते. मतमतांच्या चर्चेमध्ये अडकून न राहता चळवळीला प्राधान्य देऊन 
काम करीत राहणे आणि एकमेकांवर विश्वास ठेवून, एकमेकांना सांभाळून पुढे जाणे हे मूल्य 
अधिक महत्त्वाचे मानून त्या काळातील लोक काम करीत होते हे आपल्याला दिसते. 

स्वातंत्र्यलढयाचे पर्व संपल्यानंतर डॉ. बारलिंगे यांच्या जीवनात सुरू होणारे पर्व आहे. 
मराठवाडयाच्या शैक्षणिक चळवळीचे. या चळवळीचा इतिहासही अजूनपर्यंत साक्षेपीपणे 
लिहिलाच गेला नाही. त्यातील फार मोठा भाग ‘ओंजळभर पाणी’मध्ये वाचायला मिळतो. 
कोणताही इतिहास म्हणजे घडणार्‍या घटनांची थंडपणे केलेली नोंद एवढेच नसते. हा इतिहास 
ज्यांच्या कार्यातून घडला त्यांच्या भावविश्वातील आंदोलने हा त्या इतिहासाचा अंत:प्रवाह असतो 
आणि त्याच्यासह मराठवाडयाच्या शैक्षणिक चळवळीच्या इतिहासाचे पहिले पर्व आपल्याला 
वाचायला मिळते. नांदेडच्या पीपल्स कॉलेजची जडण घडण करणारी माणसे आणि त्यांचे 
आपापसातील संबंध यांचे सुंदर चित्रण येथे पहायला मिळते. प्रत्येक ठिकाणी डॉ. बारलिंगे 
आपल्या सर्व स्वभाववैशिष्टयांसह सतत डोकावताना दिसतात. हा भाग डॉ. बारलिंगे यांनी, तो 
काळ संपल्यावर काही दशकांनी, लिहिला असला तरी इतक्या दीर्घ कालावधीनंतरही नांदेडच्या 
दिवसांतले कितीतरी क्षण ते ताजेपणाने अजूनही जगत होते याचे प्रत्यंतर येते. तसेच या जगण्याचे 
तटस्थपणे केलेले तात्विक विश्लेषणही तत्त्वचिंतनातील ताजेपणा आणि जिवंतपणा दाखविते. 

डॉ. बारलिंगे हे संशोधन आणि अध्यापन यासाठी दीर्घकाळ परदेशातही राहिले होते. त्यापैकी 
इंग्लंड व युगोस्लाव्हिया या दोन देशांतील वास्तव्याचे चित्रण आत्मचरित्रात वाचायला मिळते. 
इंग्रज माणसाची एकंदरीत प्रवृत्ती येथे पहायला मिळते. पण त्याहूनही फार महत्त्वाचे म्हणजे 
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत श्रेष्ठ समजल्या जाणार्‍या काही तत्ववेत्यांचे व्यक्तिचित्रण, 
त्यांच्यासमवेत व्यतीत केलेल्या क्षणांचे वर्णन आणि युरोपातील स्थलवर्णन. निसर्ग जसा आणि 
जितका सुंदर आहे तसेच मनुष्याच्या स्वभावाचे पैलूही विलोभनीय आहेत. या गोष्टींची साक्ष 
पटते हा भाग वाचताना. इंग्लंड आणि युगोस्लाव्हियातील निसर्ग, समाज आणि काही निवडक 
व्यक्ती यांची चित्रणे वाचकाला केवळ सुंदरच वाटतात, असे नव्हे तर ती उदबोधकही वाटतात. 
या व्यक्तींच्या आणि देशांच्या भेटीगाठीतून लेखकाला जे मिळाले त्यातले बरेचसे हे चित्रण 
वाचूनच आपल्याला मिळते इतके हे चित्रण प्रत्ययकारी आहे. 

आत्मचरित्रातील आणखी एक भाग म्हणजे डॉ. बारलिंगे साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष 
असतानाच्या त्यांच्या कारकिर्दीच्या वर्णनाचा भाग. हा भाग खूपच त्रोटक आणि अपुरा आहे हे 
जाणवते; पण अपुरा वाटणारा हा भागही या आत्मचरित्राच्या पूर्णतेत मोलाची भर घालतो हेही 
लक्षात आल्यावाचून रहात नाही. कडवट आणि निराधार टीकेला तोंड देत काम करीत 
राहिलेल्या या काळातील लेखकाचे वर्णन त्रोटक असले तरी खूप बोलके आहे, त्याची 
स्वभाववैशिष्टये आणि संस्कार प्रकर्षाने व्यक्त करणारे आहे. यातही तीन वेगळया आणि 
महत्त्वाच्या व्यक्तींचे चित्रण आले आहे. 

या ओघात येणार्‍या पण सांगता सांगता सुटलेल्या काही आठवणी मागाहून लिहिल्या आहेत. 
तसेच अपघातांच्या मालिकेवरील एक भाग स्वतंत्रपणे आला आहे. ‘ओंजळभर पाणी’चे 
सगळयात महत्त्वाचे वैशिष्टय म्हणजे त्यात लेखक आपल्या अनुभवाचे हृद्य चित्रण करीत जातात 
आणि त्यावर टिपणेही करतात. या टिपणांमधून लेखक एक कसलेले विचारवंत अन तत्त्वज्ञ 
आहेत हे प्रकर्षाने लक्षात येते. 

लेखकाची शैली साधी, सरळ वाक्यरचना करण्याची आहे. त्यात अलंकारिकता नाही; पण 
परिणामकारकता खूपच आहे. जागोजागीच्या वर्णनांमध्ये काव्यात्मकता आहे. विशेषत: आपल्या 
पत्नीवर लिहिलेला भाग, त्यातील भावनांचा हळुवारपणा आणि काव्यात्मकता यांनी खरोखरीच 
मनोज्ञ झाला आहे. यात विस्मयकारक प्रसंग काही प्रमाणात आहेत. पण संपूर्ण पुस्तकाचा एकूण 
परिणाम विस्मयकारक होतो. हे व्यक्तिमत्त्व असे घडत जाताना त्यातून उभे राहणारे जीवनच 
विस्मयकारक आहे, हे लक्षात येते. 

पुस्तकाच्या संकलन संपादनातील नेटकेपणा जागोजागी लक्षात येतो. लेखकानंतर त्यांच्या 
कन्याद्वयीने हे जिकीरीचे काम मोठया प्रयत्नाने करून हे आत्मचरित्र वाचकांना उपलब्ध करून 
दिले याबद्दल वाचकवर्ग निश्चितच त्यांचा आभारी राहील, इतके मोलाचे हे पुस्तक आहे. 
तितकेच श्रेय कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचेही आहेच. एक वेगळे आणि अनेक दृष्टींनी महत्त्वाचे 
पुस्तक मराठी वाङ्मयात अवतीर्ण झाले आहे. 
View full details