Skip to product information
1 of 1

Half Price Books India

Jaganyatil Kahi जगण्यातील काही By अनिल अवचट Anil Awachat ...

Jaganyatil Kahi जगण्यातील काही By अनिल अवचट Anil Awachat ...

Regular price Rs. 99.00
Regular price Rs. 150.00 Sale price Rs. 99.00
Sale Sold out
Condition


पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या गोष्टींचे शब्दचित्र किती नेमके आणि पारदर्शी असू शकते, त्याचा प्रत्यय डॉ. अनिल अवचट यांच्या 'जगण्यातील काही' आणि 'दिसेल ते' या पुस्तकांत पानोपानी येतो. विविध सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारे, त्यावर भाष्य करणारे तळमळीचे कार्यकर्ते असे एक व्यक्तिमत्त्व त्यांच्यापाशी आहे. अनेक छंदही त्यांच्या सोबतीला आहेत आणि वेगळे, नवे टिपणारी दृष्टी तर त्यांच्याबरोबर सततच वावरत असते. डॉ. अवचट यांच्या आतापर्यंतच्या लेखनात ही वैशिष्टये ठळकपणाने दिसतात. अशाच चित्रदर्शी शैलीतील लेखनाचे उत्तम नमुने या पुस्तकांत आहेत.
'जगण्यातील काही' या पुस्तकातील चोवीस लेखांत शाळकरी वयातील आणि पुण्यात वैद्यकीय शिक्षण घेतानाचे काही अनुभव आहेत; तसेच 'ठाण्याचं घर', 'ठाण्याचा पाऊस', 'फर्ग्युसन कॉलेज', 'एक सह-प्रवास' अशी अनुभवचित्रेही त्यात आढळतात. हे पुस्तक त्यांनी मुंजाबा डोंगराला, दगडी वेशीला, कौलारू शाळेला, डोहातील मासोळीला, नदीवर अश्रू ढाळणार्‍या सासुरवाशिणींनाही अर्पण केले आहे. हे उल्लेख वाचले तरीही लेखकाचे मन कोणकोणत्या निखळ अनुभवांशी समरस झालेले आहे, ते लक्षात येते. लहानपणी आठवणींत घट्ट बसलेली गावातील ही सारीच शब्दचित्रे अतिशय वेधक आणि वाचकाच्या मनातही तशीच समांतर चित्रे निर्माण करणारी आहेत.
'दिसेल ते' हे पुस्तकाचे शीर्षकच आशय स्पष्ट करणारे आहे. सर्वसाधारणपणे आपल्यापैकी अनेकांच्या नजरांना पुस्तकातील विषय केव्हा ना केव्हा भिडलेले असले, तरी ही चित्रे वाचताना लेखकाची वेगळी नजर जाणवत राहते. आपणही खूप पाहतो, अनुभवतो; पण ते थेटपणाने व्यक्त करीत नाही. लेखकाने या अनुभवांना शब्दरूप दिले आहे. अर्थातच त्यासाठी आवश्यक असणारी ताजी, प्रवाही आणि साधी-सोपी शैली लेखकाकडे आहे. या शैलीत अभिनिवेश नाही. पांडित्याचा आव नाही. अनुभवांची व्यापकता उलगडून दाखविण्याचा सोस नाही. जे दिसते ते, जे अनुभवले ते अगदी तसेच मांडणे, एवढी साधी भूमिका या सार्‍याच लेखनामागे आहे.
डॉ. अवचट यांची स्वत:ची वेगळी लेखनशैली आहे. 'पूर्णिया'पासून 'माणसं', 'कोंडमारा', 'गर्द', 'धागे उभे-आडवे', 'धार्मिक', 'स्वत:विषयी', 'कार्यरत', 'छंदांविषयी', 'प्रश्न आणि प्रश्न'पर्यंतच्या त्यांच्या पुस्तकांत अनेक अनुभवचित्रे वाचकांच्या मनाला भिडली आहेत. आपणही लेखनाबरोबर प्रवास करीत आहोत, तोच अनुभव घेत आहोत, असे वाटत राहते. साधे-सोपे लिहिणे आणि मुख्य म्हणजे साध्या-सोप्या प्रसंगांत- अनुभवांत वेगळेपण शोधणे, हे कठीण असते. पण त्यालाच सोपेपणाचे रूप देणारे हे लेखन म्हणूनच खूप जवळचे, आपले वाटत राहते.
हे सर्वच लेखन प्रामुख्याने विविध दिवाळी अंकांसाठी केलेले आहे. त्या त्या वेळी अनेकांनी ते वाचलेलेही असेल, परंतु पुस्तकात सलग वाचताना या लेखनाशी आपले नाते अधिक निकट जुळून जाते. दोन्ही पुस्तकांवर 'मौजे'च्या निर्मितीचा वेगळा ठसा आहे; तसेच मुखपृष्ठावर चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या शैलीची मुद्रा आहे.
View full details